• Today is: Monday, July 23, 2018

विराट कोहली राष्ट्रभक्त नाही; भाजप आमदाराचे वक्तव्य

NextGen News
December20/ 2017

भारताबाहेर जाऊन लग्न केल्यामुळे मध्य प्रदेशातील भाजपच्या आमदार महाशयांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या राष्ट्रभक्तीविषयी शंका उपस्थित केली आहे. विराट कोहली याने ११ डिसेंबर रोजी त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा हिच्याशी विवाह केला होता. त्यांच्या हा विवाहसोहळा इटलीत पार पडला होता. मात्र, या मुद्द्यावरून भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनी विराट कोहलीवर टीका केली.

विराट कोहली भारतात राहून पैसे कमावतो. मात्र, लग्नासाठी त्याला भारतातील एकही ठिकाण पसंत पडत नाही. भारत अस्पृश्य आहे का?, असा सवाल पन्नालाल शाक्य यांनी उपस्थित केला. भगवान राम, भगवान कृष्ण, राजा विक्रमादित्य , युधिष्ठिर या सर्वांनी भारताच्या भूमीवरच विवाह केला. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या देशातच लग्न केले पाहिजे. कुणीही लग्नासाठी परदेशात जाता कामा नये. कोहलीने याठिकाणी पैसे कमवले आणि परदेशात जाऊन कोट्यवधी रूपये उधळले. विराट आणि अनुष्काने लग्नासाठी जेवढा पैसा खर्च केला, त्यात किती गरीबांना रस्ता आणि वीज मिळाली असती. दोघांनीही लाखो चाहत्यांचा अपमान केला आहे. त्याच्या मनात देशासाठी आदर नाही. यावरून तो राष्ट्रभक्त नसल्याचे सिद्ध होते, असे पन्नालाल शाक्य यांनी म्हटले.

big banner